दहशतवाद विरोधी शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी केली कारवाई!
रांजणगाव : सुदर्शन दरेकर( प्रतिनिधी )
रांजणगाव कारेगाव परिसर औद्योगिक दृष्ट्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या परिसरात वास्तव्यात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न होत असल्याने पोलिसांनी धडक कारवाई करून सदर कारवाई केली.
दहशतवाद विरोधी शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी ही कारवाई केली आहे. आरोपींपैकी 09 जणांकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व 01 इसमाकडे बनावट मतदानकार्ड मिळून आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंकज देशमुख यांनी दिली.
(ता. 21) दहशतवाद विरोधी शाखेचे पथक रांजणगाव पोलीस स्टेशन परिसरात गस्त घालीत होते. यावेळी पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विशाल गव्हाणे यांना गोपनीय माहिती मिळाली की, गंजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगावच्या परिसरात काही बांगलादेशी नागरीक हे बेकायदेशीरपणे राहत आहेत. मिळालेली माहिती वरिष्ठांना तसेच गुन्हे अन्वेषण शाखेला दिली. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस स्टाफसह कारेगाव परीसरामध्ये शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत इसमांचा शोध घेतला असता कारेगावच्या हद्दीमध्ये भाड्याने राहण्यास असणारे 15 पुरुष, 04 महिला व 02 तृतीयपंथींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता हे सर्वजण बांगलादेशी नागरीक असुन त्यांनी भारत बांगलादेश सीमा ओलांडुन कोणताही वैद्य भारतीय पारपत्र परवाना नसताना देखील भारतामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करून महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हयातील कारेगाव (ता. शिरूर) येथे बनावट भारतीय देशाचे आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदानकार्ड धारण करून वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यापैकी 09 इसमांकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व 01 इसमाकडे बनावट मतदानकार्ड
मिळून आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग, प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शना खाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहा. फौजदार विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार विशाल भोरडे, रविंद्र जाधव, मौसीन शेख, ओंकार शिंदे, तसेच रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात सहायक फौजदार डी. आर. शिंदे, विजय सरजीने, विलास आंबेकर, उमेश कुतवळ, विद्या बनकर, शितल रौधळ यांचे पथकाने केली.
